भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. गेल्या चार वर्षात कृषी विकासाचा दर कमी झाला असून गुंतवणूक कमी झाल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. शेतकरी देशाचा कणा आहे हे विसरू नये तसंच शेतक-यांनी इंग्रजांनाही हलवून सोडले होते त्यामुळे सरकारने शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नये, असं केलं तर ते सरकारला महाग पडेल असा इशाराही सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. सध्या सरकारचा दृष्टीकोन पश्चिम देशांची वाहवा करण्यावरच आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत सरकार गवगवा करत आहे. परंतू वस्तूस्थिती तशी नाही असा टोलाही त्यांनी सरकारला हाणला आहे.
कृषीमालाच्या निर्यातीसाठी सराकरने प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत मी सरकारला अनेकवेळा सांगितले आहे. मात्र त्यांनी ते ऐकले नाही. आता शेतकरी मैदानात उतरला आहे तर त्याला प्रत्येकाने पाठिंबा दिलाच पाहिजे असंही स्वामी म्हणाले. राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरोधात लढा उभा केला. त्या विद्रोह मध्ये शेतक-यांनी पैसे देऊन मदत केली याची आठवणही स्वामी यांनी सरकारला करुन दिली. कालचे शेतकरी आंदोलन आणि देशातील शेतक-यांच्या स्थितीबाबत स्वामी यांनी आपली भूमिका मांडली आहे. स्वामी हे रोखठोक बोलण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सरकार आता त्यांच्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देते आणि शेतक-यांच्या प्रश्नावर काय उपाययोजना करते ते पहावं लागेल.
सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल भाजपाचे नेते आता सरकारविरोधात बोलू लागले आहे. यापूर्वी शस्त्रूघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा या दोन्ही बिहारी नेत्यांनी मोदी आणि त्यांच्या सराकरविरधात जोरदार मोहिम उघडली आहे. राज्यात विदर्भात झालेल्या शेतकरी आंदोलनात तर यशवंत सिन्हा यांनी पुढाकार घेतला होता. 2014 मध्ये मोदींना पाठिंबा देणारे राम जेठमलानीही मोदींवर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी तर आता मोदींना सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांना साथ करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रीय नेत्यांच्या नाराजीवर मोदी आणि त्यांचे सरकार आणि पक्ष म्हणून भाजप काय भूमिका घेतं याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रातूनही मोदी आणि राज्य सरकारच्या विरोधात भाजपमधूनच नाराजी वाढत आहे. भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी तर अनेक दिवस मोदींच्या धोरणांवर आणि कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर थेट खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल करत विदर्भात सरकारविरोधात यात्रा काढली आहे. त्यामुळे एकूणच शेतकरी आणि जनतेमध्ये भाजप सरकारविरोधात रोष निर्माण होत असताना आता भाजपच्या नाराज नेत्यांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे.
COMMENTS