तुळजापूर – आताच शरद पवारसाहेब वाईट कसे झालेत? – सुनील चव्हाण

तुळजापूर – आताच शरद पवारसाहेब वाईट कसे झालेत? – सुनील चव्हाण

तुळजापूर – शरद पवारांनी 40 वर्षे तुमच्या घरात सत्ता दिली. तुम्हाला मंत्री केले. तेव्हा पवार साहेब चांगले होते. आता तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी त्यांची साथ सोडलीय. इतके दिवस चांगले असलेले पवार साहेब आताच कसे वाईट झालेत, असा प्रश्न करीत, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांनी माजी मंत्री राणा पाटील यांना आवाहन दिले आहे. 72 गावातील गावभेट दौर्‍यात सुनील चव्हाण यांनी विरोधकांवर घणाघात केला.

विरोधकांकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या वयावरुन टीका करण्याचे काम विरोधक करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात तुमच्यासाठी तब्बल 60 सभा मधुकरराव चव्हाण यांनी घेतल्या. तेव्हा विधानसभा निवडणुकीत याची परतफेड करण्याची ग्वाही तुम्हीच दिली होती. पण सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही दुसर्‍या पक्षात गेलात आणि ज्या शरद पवार साहेबांनी मोठे केले त्यांनाच वाईट म्हणू लागलात.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपाइं, शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ डीसीसी बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांनी रविवारी (दि.13) उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली, सारोळा (बु), काजळा, कोळेवाडी, इर्ला, दाऊतपूर, सांगवी, लासोना, समुद्रवाणी, राजुरी, चिखलीयेथे गावभेट दौरा काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे रवींद्र इंगळे, काँग्रेस सेवा दलाचे बलभीम जाधव, रोहीत पडवळ, पंकज पडवळ आदीसह गावागावातील स्थानिक पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

सुनील चव्हाण म्हणाले की, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून मधुकरराव चव्हाण यांना जनतेने पाचवेळा संधी दिली. लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या विजयासाठी प्रचार केला. तेच आता तुळजापूर मतदारसंघात येऊन मधुकरराव चव्हाण यांच्यावर टिका करत आहेत. तुमच्या विजयासाठी मतदारसंघात तब्बल 60 सभा घेतल्या. तेव्हा तुम्ही कौतुक करीत होतात. आता विधानसभा निवडणुकीत विकासाचे कोणतेही ठोस मुद्दे नसल्यामुळे तुम्ही बुजुर्ग नेत्यावर टिका करीत आहात. त्यामुळे जनताच तुम्हाला या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. या गावभेट दौर्‍यात गावागावातील नागरिकांनी या निवडणुकीत विकासकामासाठी कोणताही पक्षभेद न बाळगता निधी उपलब्ध करून देणारे काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

COMMENTS