आदिवासींचा नागपुरात एल्गार, ‘हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही!’

आदिवासींचा नागपुरात एल्गार, ‘हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही!’

नागपूर – विरोधी पक्षांच्या हल्लाबोल मोर्चानंतर बुधवारी आदिवासी बांधवांचा विधीमंडळावर मोर्चा धडकला होता. सभागृहात विरोधकांचा वाढता गोंधळ, विरोधी पक्षांचा विधीमंडळाबाहेर मंगळवारचा हल्लाबोल मोर्चा आणि बुधवारी झालेला असंख्य आदिवासींचा विराट मोर्चा यामुळे नागपूरमधील गुलाबी थंडीतील वातावरण तापत असल्याचं दिसत आहे. या वाढत्या मोर्चांमुळे फडणवीस सरकारची डोकेदुखीही तेवढीच वाढत आहे. आदिवासींच्या हक्कासाठी लढणा-या राष्ट्रीय आदिम कृती समितीनं हा मोर्चा काढला होता. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्या आला होता. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या नंदा पराते यांनी दिला आहे.

संविधानानुसार अधिकार देण्यात येऊनही हलबा, हलबी, धनगर, माना, गोवारी, कोळी, ठाकूर, धोया, मन्नेवार, मन्नेबारलू आदि 33 आदिमांना बोगस ठरवत त्यांना आरक्षणाचा लाभ दिला जात नसल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. या आदिवासी जमातींना संविधानानं दिलेल्या हक्कांपासून मागील ४० वर्षांपासून सरकारनं वंचित ठेवलं आहे. त्यामुळे आमचा हक्क आम्हाला द्या अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

बुधवारी सकाळी गोळीबार चौकात निघालेल्या या मोर्चात राज्यभरातील लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता. या मोर्चाला राज्यातील कानाकोप-यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी आम्हाला आमचे हक्क द्या अशी मागणी सरकारकडे केली आहे. सरकारनं आतापर्यंत फक्त आश्वासनच दिली. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आस्वासनांना बळी पडणार नसल्याचा इशारा मोर्चातील आदिवासी बांधवांनी दिला आहे.

COMMENTS