मदुराई – तामिळनाडूमध्ये आणखी एका राजकीय पक्षाचा उगम झाला आहे. शशिकला यांचे भाचे आणि अण्णाद्रमुक पक्षाचे माजी नेते टीटीव्ही दिनकरन यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. मदुराई येथील जाहीर सभेत त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली आहे. अम्मा मक्कल मुनेत्र कझागम (एएमएमके) असं दिनकरन यांच्या नव्या पक्षाचे नाव असून कुकर हे त्यांच्या पक्षाचे चिन्ह आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाच्या झेंड्यावर माजी मुख्यमंत्री जललिता यांचा फोटो आहे. आमचा पक्ष आगामी सर्व निवडणुका लढवणार असून त्यामध्ये विजय प्राप्त करणार असल्याचा दावा दिनकरन यांनी केला आहे.
दरम्यान दिनकरन यांनी मागील महिन्यात जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांनी नवा पक्ष काढला आहे. त्यानंतर आता दिनकरन यांनीही नव्या पक्षाची घोषणा केल्यामुळे तामिळनाडूतीला राजकारणात मोठे बदल होत असल्याचं दिसत आहे..
जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील राजकीय वातावरणात मोठे फेरबदल होत असल्याचं दिसून येत आहे. अण्णाद्रमुकमधील के.पलानीस्वामी आणि ओ.पनीरसेल्वम यांच्या गटाने हातमिळवणी केली होती. त्यानंतर रजनिकांत आणि कमल हसन यांच्या नव्या पक्षानंतर आता दिनकरन यांच्या नव्या पक्षाचा उगम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात तामिळनाडूतील राजकारणामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे.
COMMENTS