त्याशिवाय पक्षाचे विलिनीकरण करता येणार नाही -उदयनराजे भोसले

त्याशिवाय पक्षाचे विलिनीकरण करता येणार नाही -उदयनराजे भोसले

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेबाबत राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार, खासदार यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय पक्षाचे विलिनीकरण करता येणार नसल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. काल अहमनदनगरमधील चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उदयनराजे भोसले आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेबाबत मला काहीच माहिती नाही. विलिनीकरणाबाबत माझ्याशी आणि इतर नेत्यांशी चर्चा करावी लागेल. योग्य ती चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. असा परस्पर निर्णय घेता येणार नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षाचे विलिनीकरण का करायचे आहे? हे आम्हाला सांगितले पाहिजे. विलिनीकरण करण्याचे ठरवले, तर कोणत्या पक्षात विलिनीकरण करायचे हे देखील पक्षातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन ठरवायला पाहिजे असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS