उद्वव ठाकरेंनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी !

उद्वव ठाकरेंनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी !

नवी मुंबई – विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती होणार की नाही हे अजून अस्पष्ट आहे. जागावाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे युतीत जागावटपावरुन तणाव पहायला मिळत आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेल्या हालचालीमुळे युती तुटते की काय अशी देखील चर्चा सुरु आहे. परंतु आज नवी मुंबईत पार पडलेल्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मात्र युतीत सर्वकाही अलबेल असल्याचं दिसत आहे.

या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रित आले होते. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळेवर आले होते. परंतु उद्धव ठाकरे यांना मात्र कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांची माफी मागितली.फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना या कार्यक्रमाला ते वेळेवर आले परंतु काही कारणास्तव मला यायला उशीर झाला. त्यामुळे मी त्यांच्यासह येथील सर्व माथाडी कामगारांची माफी मागतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोलताना शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. युतीचं सरकार नेहमीच माथाडी कामगारांच्या पाठिशी उभं ठाकलं आहे. यापुढेही हे महायुतीचं सरकार तुमच्या पाठिशी असणार असल्याचं आश्वासन फडणवीस यांनी माथाडी कामगारांना दिलं आहे. त्यामुळे युती तुटते की काय अशी चर्चा असताना आगामी निवडणुकीतही महायुती होणार असून युतीत सर्व काही अलबेल असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

COMMENTS