मुंबई – विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविण्याची ऑफर दिली असल्याचं बोललं जात होतं. अखेर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं स्पष्टीकरण दिलं आहे. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली जाणार नाही. ती केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं आहे. पक्षाकडे अनेक जणांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून, बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रवादी पक्षाने किंवा आमच्या एकाही नेत्याने उज्ज्वल निकम यांना लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत किंवा उमेदवारीबाबत संपर्क साधलेला नाही. राष्ट्रवादी त्यांना उमेदवारी देणार ही केवळ अफवाच आहे. आमच्याकडे पक्षातील अनेक नेते जळगावमधून लढण्यास इच्छुक आहेत. असे असताना आम्ही बाहेरच्या उमेदवाराला तिकीट कशाला देऊ? असे मलिक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना अजित पवार यांनी जळगावमधील नेते व पदाधिका-यांना निकम यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम करणार का? असा सवाल केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी निकम यांना लोकसभेचे तिकीट देण्याबाबत चाचपणी करत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे निकम हे राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. परंतु नवाब मलिक यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे निकम यांच्या राजकारणातील एन्ट्रीला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.
COMMENTS