सिंधुदुर्गामध्ये दोन खासदारांमध्ये राडा

सिंधुदुर्गामध्ये दोन खासदारांमध्ये राडा

सिंधुदुर्ग – नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामध्ये ३६ च्या आकडा आहे.राणेंनी शिवसेना सोडल्यापासून कोकणात सध्या ग्रामपंचायत निवडणूकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्वच ठिकाणी राणे विरुध्द शिवसेना असा संघर्ष पहावयास मिळत आहे. त्यातही राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थापन झालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून तर नारायण राणे व त्यांचे दोन पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि राणे कुटुंबातील सदस्यांमध्ये गेले काही दिवस सातत्याने खटके उडत आहेत. आज तर थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यामध्ये खटके उडले.

मागील काही वर्षांपासून राणे विरुध्द सेना संघर्षाचा सिंधुदुर्ग हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. सोशल मिडियावर या दोन्ही बाजूकडून आरोपप्रत्यारोप करून एकमेकांवर चिखलफेक केली जाते. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला स्थानिक खासदार विनायक राऊत, नारायण राणे, आमदार नितेश राणे, वैभव नाईक व अन्य प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत भाजपचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्यावरून आपली भूमिका मांडली. त्यावर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. यात मग विनायक राऊत आणि नारायण राणे या दोघांनीही उडी घेतल्याने वादाची ठिणगी पडली. नारायण राणे आपल्या जागेवरून उठले. पाठोपाठ नितेश राणेही उभे राहिले आणि विनायक राऊत यांच्याशी त्यांनी जोरदार वाद घातला. राणे बोटाने इशारा करत राऊत यांना सुनावत होते. कालवा फुटल्यानंतर तिथे अधिकारी वेळेत पोहचले नाहीत, असा मूळ आक्षेप होता. त्यात राणे यांनी काही जिल्हा परिषद सदस्यांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद अधिक चिघळला. विनायक राऊत हेसुद्धा जागेवरून उभे राहिले व त्यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोघांच्या समर्थकांनीही सभागृहात गदारोळ सुरू केला. तणाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन मग पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले.

COMMENTS