राष्ट्रवादीकडून पक्षनिष्ठेची कदर, काठावरच्यांना ठेंगा !

राष्ट्रवादीकडून पक्षनिष्ठेची कदर, काठावरच्यांना ठेंगा !

मुंबई – विधानपरिषदेच्या आमदारांमधून निवडून दिल्या जाणा-या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकच जागा लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं परभणीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बाबाजानी गेली अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गेली सहा वर्ष ते परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार होते. यावेळीही त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी केली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर परभणी हिंगोलीची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे बाबाजानी यांची संधी हुकली. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करुन बाबाजानी शांत राहिले. त्यामुळे आता विधान परिषदेच्या एका जागेसाठी पक्षाने बाबाजानी यांना संधी दिली आहे. बाबाजानी यांच्या पक्षनिष्ठेची पक्षाने एक प्रकार कदरच केली आहे.

दुसरीकडे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हेही विधानपरिषदेसाठी इच्छुक होते. मात्र गेल्या काही वर्षात त्यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा अधूनमधून सुरू असते. तसे संकेत देणारी विधानंही पाटील करतात. मात्र तरीही त्यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी तिकीट मागितले होते. तिकीट मिळवण्यासाठी वेगेवेगळी दबावतंत्र वापरली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पक्ष अडचणीत असताना पक्षासोबत एकनिष्ठ राहण्यापेक्षा पक्ष सोडण्याची धमकी देण्यापासून वेगवेगळी दबावतंत्र वापरल्यामुळे त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. धरसोड वृत्तीचा फटका पाटील यांना बसल्याचं बोललं जातंय. आता तिकीट नाकारल्यानंतर ते आगामी काळात पक्षासोबत राहतात की भाजपची वाट धरता ते पहावं लागेल.

COMMENTS