विधान परिषद स्वबळावर लढवण्याचे शिवसेनेचे संकेत, नाशिक आणि कोकणातून ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब !

विधान परिषद स्वबळावर लढवण्याचे शिवसेनेचे संकेत, नाशिक आणि कोकणातून ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब !

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक जाहीर झाली असून सध्या दोन जागा असलेल्या भाजपने नाशिक व उस्मानाबाद-बीड-लातूर या मतदारसंघांतून निवडून येणाऱ्या आणखी दोन जागा जिंकण्याचे डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र नाशिकमध्ये शिवसेनही युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. नाशिकमधून नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे तर कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे या निवणुकीसाठी आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे..

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), जयवंत जाधव (नाशिक), बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) अशा एकूण सहा सदस्यांची मुदत मे-जूनमध्ये संपत आहे. त्यामुळे आज या सहा जागांसाठीच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. २१ मे रोजी मतदान होईल, तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच सध्या भाजपकडे या सहा जागांपैकी राज्यमंत्री प्रवीण पोटे, मितेश भांगडिया यांच्या रूपाने दोन जागा आहेत, तर राष्ट्रवादीच्या तीन जागा आहेत. एक जागा काँग्रेसकडे असूना या निवडणुकीत नाशिक व उस्मानाबाद-बीड-लातूर या दोन जागांवर भाजपचे लक्ष असून त्या जागा जिंकून आपले संख्याबळ दोनने वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघांतील काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप देशमुख यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघ व मराठवाडय़ातील मतपेढी हे दोन घटक लक्षात घेऊन मराठा समाजातील किंवा ओबीसी समाजातील ‘सक्षम’ नेत्यास या मतदारसंघात उतरवण्याचा विचार सुरू आहे, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. त्यामुळे मराठवाडय़ात भाजपच्या या मनसुब्यांना शिवसेनेचा फारसा अडथळा येणार नसल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS