विदर्भातील काँग्रेसचा मोठा गट पक्षनेतृत्वावर नाराज, पुढील भूमिका काय ?

विदर्भातील काँग्रेसचा मोठा गट पक्षनेतृत्वावर नाराज, पुढील भूमिका काय ?

चंद्रपूर –  काँग्रेसच्या विदर्भातील जनआक्रोश आंदोलनाची चर्चा झाली ती सरकाविरोधातल्या आंदोलनामुळे नव्हे तर काँग्रेसमधल्या मतभेदांमुळे. जनआक्रोश सभेचं सोमवारी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या दोन नेत्यांनी दोन ठिकाणी जनआक्रोश सभेचं आयोजन केलं होतं. शेवटपर्यंत प्रयत्न करुनही मतभेद मिटवता आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसची जनआक्रोश आंदोलन दोन ठिकाणी झाले.

काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी एका सभेचं आयोजन केलं होतं. तर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दुस-या सभेचं आयोजन केलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेक नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या सभेला हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही वडेट्टीवार यांनी आयोजित केलेला  कार्यक्रम अधिकृत असल्याचं सांगितलं.

गेल्या अनेक दिवसांपासून वडेट्टीवार आणि पुगलिया यांच्या गटात मोठा वाद सुरू आहे. प्रदेशाध्यक्षांनाही तो वाद मिटवता आला नाही. मात्र प्रदेशाध्यक्षांनी आपले वजन वडेट्टीवार यांच्या गटात टाकल्यामुळे साहजिक पुगलिया चव्हाणांवर नाराज आहेत. त्यामुळे नाराज नरेश पुगलिया हे पक्ष सोडणार अशी कुजबूज विदर्भातल्या राजकीय वर्तुळात आहे.

या चर्चेला पुष्टी देणारी वक्तव्य वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या सभेत काही नेत्यांच्या भाषणात आली. माजी मंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेसमधील काही नेते पक्षाबाहेर पडण्याच्या तयारी असल्याचं सांगून. त्यांनी तसा मुर्खपणचा निर्णय घेऊ नये असं सांगितलं. तर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुगलियांचं नाव न घेता अशीच पक्षशिस्त मोडली तर यापुढे कारवाई केली जाईल असा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे पुगलिया आता  का भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

नरेश पुगलिया यांनी आयोजित केलेल्या जनआक्रोश सभेला विदर्भातील काही बड्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये विद्यमान आमदार सुनिल केदार, माजी मंत्री नितीन राऊत, अनिस अहमद, सतिष चतुर्वेदी यांच्यासह काही माजी आमदार आणि खासदारांनी हजेरी लावली. या सभेमध्ये प्रदेशाध्यक्षांवरही निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आता या गटाची पुढील भूमिका काय याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या गटाने थेट प्रदेशाध्यक्षांना आणि प्रभारींना आव्हान दिले आहे. त्यामुळे हे एक प्रकारे हायकमांडशी आव्हान समजले जात आहे. त्यामुळेच आता यावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते आणि नाराज गटाची पुढील भूमिका काय असेल याकडं राज्यातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS