रेल्वे प्रवासादरम्यान आमदारांना चोरट्यांचा फटका, दोन आमदारांचं साहित्य आणि रोकड लंपास !

रेल्वे प्रवासादरम्यान आमदारांना चोरट्यांचा फटका, दोन आमदारांचं साहित्य आणि रोकड लंपास !

मुंबई – अनेकवेळा सर्वसामान्यांना रल्वेमध्ये प्रवास करत असताना चोरट्यांनी लुटल्याच्या घटना घडत असतात. परंतु चोरट्यांनी सामान्यांना सोडून थेट दोन आमदारांच्याच सामानावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईकडे येत असलेल्या दोन आमदारांच्या साहित्याची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. याबाबत बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे आणि शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर यांनी सीएसएमटीच्या लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली आहे.

दरम्यान पावसाळी अधिवेशन चालू असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचे आमदार बोन्द्रे आपल्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासोबत रविवारी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईला येत होते. सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान आमदार बोन्द्रे जेव्हा कल्याण स्टेशनला उतरणार त्याचवेळी चोरट्याने त्यांच्या पत्नी वृषाली जवळील पर्स हिसकावून पळवून लावली. तसेच बोन्द्रे यांच्या जवळील महत्वाच्या कागदपत्रांची फाईल ही त्यांनी पळविली. बोन्द्रे यांनी चोरट्याचा पाठलाग करुन पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटा पळ काढण्यात यशस्वी झाला. बोन्द्रे यांच्या पत्नीच्या पर्समध्ये 26 हजारांची रोकड, एटीम कार्डसह इतरही साहित्य चोरीला गेलं आहे.

तर जालन्यावरुन देवगिरी एक्स्प्रेसने जाणाऱ्या आमदार रायमूलकर कल्याण स्टेशनला अतरताना मोबाईल आणि खिशातील 10 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या दोन्ही घटनांवरुन मुंबईत चोरट्यांचा सुळसुळाट सुरु असल्याचं पहावयास मिळत आहे.

COMMENTS