उस्मानाबाद, 6 सप्टेंबर – जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धूम सुरू झाली असून मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने कारभारी चांगलेच तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता सुरू झाली आहे. पहिल्यांदाच थेट जनतेतून कारभारी निवडला जात असल्याने उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील वाशी, भूम व परंडा वगळता अन्य तालुक्यातील ग्रामपंचायतीची मोठी संख्या आहे. उस्मानाबाद तालुक्यातील 44, तुळजापूर तालुक्यातील 48, उमरगा 24, लोहारा 13, कळंब 30, वाशी चार, भूम दोन तर परंडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर, येडशी, अंबेजवळगा, कसबे तडवळा, रुईभर या प्रमुख ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. 10 ते 15 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या यातील काही ग्रामपंचायती असल्याने जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे लक्ष गावकारभाराकडे असणार आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तेर गावची निवडणूक होत असल्याने कारभाऱ्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, सांगवी मार्डी, काटी, नंदगाव, चिवरी, आपसिंगा गावाचा यामध्ये समावेश आहे. उमरगा तालुक्यातील येणेगूर, माडज, कोराळ, कोथळी, केसरजवळगा, आलूर या प्रमुख ग्रामंपचायतींचा यामध्ये समावेश आहे. लोहारा तालुक्यातील सातूर, मागणी, जेवळी या प्रमख ग्रामपंचायीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. कळंब तालुक्यातील खामसवाडी, मोहा, शिराढोण, शेळका धानोरा, डिकसळ, खेर्डा ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने कारभारी कामाला लागले आहेत.
COMMENTS