उस्मानाबाद – शंभू महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकविले !

उस्मानाबाद – शंभू महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकविले !

उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभु महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकविल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव आपेट हे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याने, कारखान्यावर कारवाई होणार का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी तुरळक साखर कारखाने सुरू होते. यातील शंभु महादेव साखर कारखान्याने 25 हजार टनाचे गाळप केले. जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही ऊस गाळपासाठी आणला होता. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. दररोज शेतकरी कारखाना स्थळावर पैशासाठी चकरा मारीत आहेत. परंतु, कारखान्यातील सुरक्षा रक्षक शेतकऱ्यांनाच धक्काबुक्की करीत हुसकावून लावीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. ऊस गाळपानंतर शेतकऱ्यांना 14 दिवसात पैसे देणे अपेक्षित असताना तब्बल सहा महिन्यानंतरही पैसे मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे कारखान्यावर अध्यक्ष दिलीपराव आपेट येतच नाहीत. साहेब आलेले नाहीत. थोड्या दिवसात पैसे मिळतील असे सांगून शेतक-यांना कारखान्याच्या आवारा बाहेर जाण्यास सांगितले जाते. जे शेतकरी याबाबत ऐकत नाहीत अशा शेतकऱ्यांना शिविगाळ करीत धक्काबुक्की करून कारखाना आवाराच्या बाहेर काढले जात असल्याचा आरोपही शेतक-यांनी केला आहे.

आपेट हे पंकजा मुंडेचे समर्थक असल्याने कारवाई नाही ?

कारखान्याचे अध्यक्ष आपेट हे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. ऊस गाळपाचे पैसे 14 दिवसात शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असताना सहा महिन्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यावर काय कारवाई होणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.  केवळ सत्ताधा-यांच्या गोटातले असल्याने आपेट आणि कारखान्यावर कारवाई होत नसल्याची कुजबूज शेतक-यांमध्ये आहे.

COMMENTS