कृषीमंत्री, पणनमंत्र्यांची हकालपट्टी करा – विखे पाटील

कृषीमंत्री, पणनमंत्र्यांची हकालपट्टी करा – विखे पाटील

सांगली  – तूर खरेदीच्या मुद्यावरून सरकारने पणन मंत्री सुभाष देशमुख आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विरोधकांची संघर्ष यात्रा आज सांगलीत दाखल झाली. इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

“22 तारखे पर्यंत, टोकन असणाऱ्या शेतक-याचीच तूर खरेदी करण्याचा निर्णय, म्हणजे सरकार शेतकऱ्यावर उपकार करत असल्या सारखं वागत आहे. तुरीचा प्रश्न निर्माण होणे हे पणन आणि कृषिमंत्रांचं अपयश  आहे. तात्काळ पणन आणि कृषिमंत्रांची हकालपट्टी करावी. जय जवान, जय किसान या घोषणेला भाजपने हरताळ फासलाय” असा हल्ला विखे पाटलांनी चढवला.

शिवसेनेचे मंत्री शेतकरी कर्जमाफीवर ढिम्मपणे बसून असतात. खरंच कर्जमाफी हवी असेल तर राजीनामे देऊन या यात्रेत सहभागी व्हावे, अशी ऑफरही त्यांनी दिली. खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तोंडावर पट्टी बांधली आहे. या लोकांनी स्वाभिमानी हा शब्द काढून टाकावा असा घणाघात विखेंनी केला. सदाभाऊ खोत यांना भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची लागण झाली आहे. धनगर समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप विखेंनी केला.

कर्जमाफीसाठीच विशेष अधिवेशन बोलवण्याची आम्ही मागणी करतोय. उद्धव ठाकरेंनी नौटंकी बंद केली पाहिजे, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

COMMENTS