मुंबई : कोळशाचा तुटवड्यामुळे राज्यात काही ठिकाणी भारनियमनाचा फटका आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना अंधारात राहावं लागत असल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
काळोखात बुडालेला महाराष्ट्र पाहता ते गेले आणि हे आले, पण काय बदलले? असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. ‘विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’ लावा! अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारनियमन सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यसरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले आहे. पूर्वाश्रमीची सगळीच सरकारे आणि राज्यकर्ते तद्दन नालायक होते. राज्य कारभार कशाशी खातात हेच त्यांना ठाऊक नव्हते. आता आम्हीच काय तो या महाराष्ट्राचा आणि देशाचा उद्धार करू, अशा गमजा मारणाऱ्या मंडळींचे बुरखे दररोजच टराटरा फाटत आहेत. विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणाऱ्या लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण होत आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
वीजनिर्मितीसाठी कोळसा आवश्यक आहे हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर कोळशाचा पुरेसा साठा करून का नाही ठेवला? टंचाई-टंचाई म्हणून तोच तो कोळसा किती दिवस उगाळत बसणार? पुन्हा कितीही उगाळला तरी शेवटी कोळसा तो कोळसाच! त्यामुळे तेच ते रडगाणे जनतेला ऐकवण्यापेक्षा एवढ्या दिवसांत कोळशाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न का नाही केलेत? केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुम्हीच सत्तेवर आहात. मग अडचण कसली? कोळशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात तुम्ही चुकला असाल, कमी पडला असाल तर तसे जाहीर करून लोडशेडिंगचे चटके सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे.
COMMENTS