गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मागील काही काळापासून बंडखोरी करणारे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी अखेर पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. याशिवाय त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचंही जाहीर केली. “मी स्वत:ला काँग्रेसमधून मुक्त करत आहे. मी भाजप किंवा दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही,” असंही वाघेला यांनी स्पष्ट केलं.

शंकरसिंह वाघेला यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या समार्थकांना बोलावून सभा घेतली. “शिवाय काँग्रेसने 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढलं आहे,” असं सांगितलं. आपल्या भाषणादरम्यान शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसवर निशाणा साधताना वाघेला म्हणाले की, “मी माझ्या आत्मसन्मानाशी तडजोड करणार नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही काम केलं आहे. मी कुठेही जाऊ शकतो, पण भाजपात जाणार नाही.”

दरम्यान , काही दिवसांपूर्वीच वाघेलांनी काँग्रेस नेतृत्वावर सडकून टीका केली होती. त्यामुळे हायकमांड नाराजही झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण वाघेलांची ज्येष्ठता लक्षात घेतला कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. यापुढे मात्र कारवाई करण्यात येईल असे प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटले होते. आज अखेर शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली.

“ क्रॉस व्होटिंगमध्ये माझा सहभाग नाही. उलट मी एनसीपी नेत्यांनाही यूपीए उमेदवार मीरा कुमार यांनाच मत देण्यास भाग पाडलं,” असा दावा शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. तसंच काँग्रेसच्या 57 आमदारांनी माझ्या सांगण्यावरुन मीरा कुमार यांना मत दिल्याचंही वाघेला म्हणाले आहे. राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंगसाठी वाघेला गटाला जबाबदार मानलं जात आहे. यामुळे यंदा होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राज्यात काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्याता आहे .

COMMENTS