देशात तथाकथीत गोरक्षकांचा हैदोस सुरू आहे. गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन आणखी एकाची हत्या करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमांसावरुन हत्या करणे हे आपल्याला कदापी मान्य नाही, आणि अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही हे सांगून 12 तास उलटाच्या आतच तथाकथीत गोरक्षकांनी झारखंडमध्ये एका व्यक्तीची हत्या केली आहे. झारखंडच्या रामगडमध्ये एका टोळक्याने हत्या केली. असगर अन्सारी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अन्सारी हा आपल्या मारुती कारने चालला होता. त्यावेळी तिथे आलेल्या टोळक्याने त्याच्या गाडीची तपासणी केली. त्यामध्ये मांस आढळले, मात्र ते मांस गायीचे असल्याचा संशय घेत जमावाने अन्सारीला गाडीच्या बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर काही वेळाने तिथे पोलीस आले. गंभीर जखमी झालेल्या अन्सारीला हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला.
COMMENTS