ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा बदला -अशोक चव्हाण

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा बदला -अशोक चव्हाण

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दुसऱ्या टप्प्यात 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. परंतु, या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने ही तारीख बदलण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने नागपूर दीक्षाभूमी आणि दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. परंतु, याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान जाहीर केल्याने मतदानाच्या टक्केवारीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची 14 ऑक्टोबर ही तारीख बदलून दुसरी तारीख जाहीर करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यानंतर खा. अशोक चव्हाण यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाचे नेते विजय सूत्राळे,विनोद शेखर तसेच डॉ. दीपक अमरापूरकर यांना श्रध्दांजली अर्पण केली. विजय सूत्राळे आणि विनोद शेखर हे काँग्रेसचे समर्पित कार्यकर्ते होते त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सच्चे कार्यकर्ते गमावले आहेत, असे  चव्हाण म्हणाले.

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या रूपात एक मुंबईने एक निष्णात डॉक्टर गमावला असून,त्यांचा मृत्यू हा प्रशासकीय हलगर्जीचा बळी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

COMMENTS