‘त्या’ भीतीने गुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार बंगळूरला केले रवाना….

‘त्या’ भीतीने गुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार बंगळूरला केले रवाना….

अहमदाबाद – राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. तर आणखी काही आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. निवडणुकीपूर्वी आमदार फुटतील या भीतीने  काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरूला पाठवलं आहे. राज्यसभा निवडणुकीपर्यंत त्यांना तेथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

येत्या 8 ऑगस्ट रोजी राज्यसभेसाठी निवडणूक होत असून गुजरातमधून कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. आमदारांची ही गळती थांबली नाही, तर अहमद पटेलांचे भवितव्य संकटात येऊ शकते. बालासिनोरचे आमदार मानसिंह चौहान आणि वनसदाचे छन्नाभाई चौधरी यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष रमणलाल व्होरा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आनंदमधील थासराचे आमदार रामसिंह परमार यांनीही राजीनामा दिल्याचे समजते. आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे कॉंग्रेसची विधिमंडळातील सदस्यसंख्या घटली आहे. मागील आठवड्यामध्ये ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी बंडाचे निशाण फडकावले होते.

गुजरात विधानसभा ही एकूण 182 आमदारांची असून काँग्रेसचे बलाबल 57 वरून आता 51 झाले आहे. भाजपच्या डावपेचांमुळे काँग्रेसला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अहमद पटेल यांना राज्यसभेसाठी निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

COMMENTS