नव्या राष्ट्रपतींना किती आहे वेतन ?

नव्या राष्ट्रपतींना किती आहे वेतन ?

आज रामनाथ कोविंद यांनी  राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली आहे. कोविंद हे भारताचे 14 वे राष्ट्रपती बनले. ता राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांचा मुक्काम सुरु होईल. राष्ट्रपती भवनात तब्बल तीनशेहून अधिक खोल्या असून साडेसातशेहून अधिक कर्मचारी आहेत. तर कोविंद यांना दीड लाख रुपये इतके वेतन मिळेल. लवकरच सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर राष्ट्रपतींच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. सातवा वेतन लागू झाल्यानंतर राष्ट्रपतींना 5 लाख रुपये इतके वेतन मिळणार आहे. याआधी 2008 मध्ये राष्ट्रपतींच्या वेतनात वाढ झाली होती. यामुळे राष्ट्रपतींचा पगार 50 हजार रुपयांवरुन दीड लाख रुपयांवर गेला होता. कॅबिनेट सचिवांना राष्ट्रपतींना जास्त वेतन मिळते, ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यावेळी केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या मानधनात वाढ केली होती.

सातव्या वेतन आयोगानंतर राष्ट्रपतीच नव्हे, तर उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनातदेखील मोठी वाढ होणार आहे. सध्या उपराष्ट्रपतींना 1.25 लाख रुपये मानधन मिळते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर उपराष्ट्रपतींना साडेतीन लाख रुपये वेतन मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ माजी राष्ट्रपतींनादेखील मिळणार आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्यावर आता राष्ट्रपतींना महिन्याकाठी दीड लाख रुपये निवृत्ती वेतन मिळेल. सध्या माजी राष्ट्रपतींना 75 हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळते.

रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनात वास्तव्य करतील. राष्ट्रपती भवनाची निर्मिती ब्रिटिश वास्तूरचनाकार सर एडविन लुटियन्स आणि हरबर्ट बेकर यांनी केली होती. राष्ट्रपती भवन 330 एकरवर उभारण्यात आलेले आहे. 1913 मध्ये या वास्तूच्या उभारणीला सुरुवात झाली. या वास्तूच्या निर्मितीसाठी 16 वर्षांचा कालावधी लागला. 23 हजारांपेक्षा अधिक मजुरांनी अथक मेहनत करुन या वास्तूची निर्मिती केली आहे.

COMMENTS