नाशिकच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे !

नाशिकच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे !

नाशिक – राज्याच्या मंत्रिमंडळात काही खाती रिकामी ठेवायची आणि असंतुष्टांना नेहमीच झुलवत ठेवयाचं ही महराष्ट्रातील पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे. मग मागचं आघाडी सरकार असो किंवा आताचं देवेंद्र फडणवीस सरकार असो. प्रत्येक मुख्यमंत्री असंच करतो. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. कधी खडसेंचं कमबॅक होणार अशी चर्चा होते, कधी खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी चर्चा होते तर कधी नारायण राणेंच्या प्रवेशामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा असते. त्यामुळे राज्यातले अनेक आमदारांना सातत्याने मंत्रिपदाची स्वप्न पडतात.

नाशिकच्याही काही आमदरांना असंच मंत्रिमडळ विस्ताराचे डोहाळे लागले आहे. नाशिक शहराने भाजपच्या पदरात भरभरुन दान टाकलं आहे. तीनही जागेवर भाजपचे आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या शपथविधी वेळीच नाशिक शहरामधून कुणालातरी मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता तीन वर्ष संपली तरी ती अपेक्षा फोल ठरली आहे. आता पुन्हा नव्याने मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्याने जिल्हातील आमदारांना पुन्हा मंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत.

भाजपचे नाशिक पूर्व चे आमदार बाळासाहेब सानप हे सध्या मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी लॉबिंग करत आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांचे ते अत्यंत जवळचे असल्याचं बोललं जातं. पालकमंत्र्यांच्या गैरहजेरीत शहरातील त्यांच्या कामाचा गाडा हाकण्याचं काम सध्या सानप करत आहेत. महाजनांच्या माध्यमातून ते राज्यमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचंही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत असंत. यावेळेला ते आहे. बाळासाहेब सानप यांना शहराध्यक्षपद मिळाल्यामुळे  शहरातून मंत्रिपदासाठी आपलीच वर्णी लागेल असं त्यांना वाटतं. शहरात नुकताच मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं चांगलंच कौतुक केलं. त्यामुळे फरांदे यांची मंत्रीपदी वर्णी लागेल असं बोललं जातंय. प्राध्यापिका असलेल्या फरांदे या टीव्ही चॅनलवरुन अनेकवेळा पक्षाची भूमिकाही मांडत असतात. त्यामुळे त्या श्रेष्ठींच्या जवळ गेल्याचं बोललं जातंय. मात्र त्यांना विरोध करणारा एक गटही तेवढचा सक्रीय आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंकाच आहे.

मंत्रिपदासाठी जिल्हातून आणखी एक आमदार इच्छुक आहेत. शिवसेनेला जर मंत्रिमंडळ विस्तारात काही मिळालं किंवा शिवेसनेत काही खांदेपालट झाला तर निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. शिवसेना स्टाईल कार्यपद्धती, रस्त्यावरची लढाई आणि भाषेवर पकड यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुखांशी त्यांची जवळीक वाढल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे त्यांनाही मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे. या सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे लागले असले तरी प्रत्यक्षतात मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते किंवा राहिलेली दोन वर्षही अशीच स्वप्न बघण्यात निघून जातात ते आता येणारा काळच सांगेल.

 

COMMENTS