निवळेच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा! : विखे पाटील

निवळेच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा! : विखे पाटील

जखमी ग्रामस्थ व पोलिसांची घेतली भेट;गावकऱ्यांशी केली चर्चा

शिवसेनेने राजकारण करण्याऐवजी ‘निवळे ’करांना न्याय मिळवून द्यावा

निवळे येथील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

निवळेच्या गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, दडपशाही व दंडेली करून निवळे येथील गावकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. मागील 75 वर्षे येथील शेतकरी जमीन कसत असताना संरक्षण खात्याने शेतकर्यां शी चर्चा न करता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेणे अन्यायकारक आहे. सरकारने सामंजस्य व संयम दाखवून ग्रामस्थांशी संवाद साधण्याची गरज आहे.

या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवरही जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, येथील खासदार व आमदार शिवसेनेचे असून, ते सरकारमधील घटक पक्ष आहे. त्यामुळे आंदोलन पेटल्यानंतर राजकारण करण्याऐवजी सरकार म्हणून त्यांनी निवळेच्या गावकऱ्यांना न्याय का मिळवून दिला नाही, अशी संतप्त विचारणाही त्यांनी यावेळी केली.

तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी कल्याण येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये जाऊन या आंदोलनातील जखमी गावकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कल्याण येथील फोर्टीस हॉस्पिटल व डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटलला जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्याही प्रकृतीचीही विचारपूस केली.

दरम्यान, निवळेच्या गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. ते म्हणाले की,आम्ही पिढ्यानपिढ्या याच जमिनीवर शेती करत आलो आहोत. सरकारने ही जमीन ताब्यात घेतली तर असंख्य कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. निवळेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही या गावकऱ्यांनी केली. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी निवळेच्या नागरिकांना सरकारकडून न्याय मिळवून द्यावा,असेही अनेक ग्रामस्थ म्हणाले. त्यावर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, सचिव बाळकृष्ण पुर्णेकर, संजय चौपाने, कल्याण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे, संतोष केनी,भोलानाथ पाटील, युवक काँग्रेसचे विजय पाटील आदी पदाधिकारी व अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 

COMMENTS