पिंपरीच्या महापौरांना मोठा दिलासा, जातपडताळणी प्रमाणपत्र वैध

पिंपरीच्या महापौरांना मोठा दिलासा, जातपडताळणी प्रमाणपत्र वैध

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे हे इतर मागासवर्गातील (ओबीसी) असल्याचा निर्वाळा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे महापौर काळजे यांच्यासह भारतीय जनता पक्षानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांनी महापौर काळजे यांच्या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता. काळजे हे मराठा असून, त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र मिळवून ओबीसीसाठी राखीव जागेवर निवडणूक लढवल्याचा आरोप खेडकर यांनी केला होता. तसेच याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापौर काळजे यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्राचे चार महिन्यांत फेरपडताळणी करण्याचे आदेश पुण्याच्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले होते. त्यानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने महापौर काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी केली. त्यासाठी त्यांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारे खेडकर, पुण्यातील मृणाल ढोले-पाटील आणि महापौर काळजे यांची सुनावणी घेतली. त्यामध्ये दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. तसेच दोन्ही बाजूंनी आलेल्या पुराव्यांचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुणे विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने महापौर नितीन काळजे हे ओबीसीच असल्याचा निर्वाळा दिला असून, त्यांचे ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र वैध ठरविले आहे.

समितीने काळजे यांना त्यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचे पत्र सोमवारी (दि. 14) दिले. त्यामुळे काळजे यांच्यासह भाजपनेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

 

 

 

COMMENTS