पुणे : तुकाराम साहेब जागे व्हा! बससेवा दरवाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : तुकाराम साहेब जागे व्हा! बससेवा दरवाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे शहरातील शालेय बससेवेचे दर वाढवल्याप्रकरणी आज मंगळवारी (दि.27) महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अचानक बस दरवाढ जाहीर केल्यानंतर अनेक शाळांनी बस सेवा नाकारली होती. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांच्या नेतृवाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. बस सेवा पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदनही देण्यात आले.

‘मुक्ताताई न्याय द्या, तुकाराम साहेब जागे व्हा’  अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी महापालिका दणाणून सोडली. या विद्यार्थ्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना गुलाबाचे फुल आणि निवेदन देत बस दरवाढ रद्द करण्याची मागणी केली.

शहरातील शाळा 15 जूनपासून सुरु झाल्या आहेत. शालेय विद्यार्थांसाठी पीएमपीएमएलकडून अगदी अल्प दरात बस सेवा दिली जाते. मात्र पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय जाहीर केला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारावी लागली. वारंवार निवेदन देऊन देखील महापालिका प्रशासन आणि पीएमपीएमएल प्रशासन निर्णय घेत नाही. त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पालिका आयुक्त कुणाल कुमार मुंढे यांच्याशी कधी चर्चा करणार ? तसेच बस दरवाढीच्या निर्णयाबद्दल मुंढे काही फेरविचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यावेळी आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, तुकाराम मुंढे यांनी कोणत्या आधारे ही दरवाढ केली याची माहिती नाही. संचालक मंडळाला त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. या गंभीर प्रश्नावर मुंढे यांच्याशी तात्काळ चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

COMMENTS