“बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधा”

“बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधा”

बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते, असे शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच राम मंदिरापासून एका विशिष्ट अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असेदेखील या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून  रेंगाळलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिया वक्फ बोर्डाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जावे. तसेच  या मंदिरापासून विशिष्ट अंतरावर मशीद उभारली जावी, असेदेखील बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ‘बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची होती. त्यामुळे या प्रकरणात इतर पक्षकारांसोबत चर्चा करण्याचा अधिकार बोर्डाकडे आहे. चर्चेतून  समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार केवळ वक्फ बोर्डाकडे आहे,’ असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे.

राम मंदिर आणि मशिदीच्या उभारणीमुळे सुरु असलेले वाद संपुष्टात येतील. यामुळे वारंवार अशांतता निर्माण होणार नाही,’ असेदेखील शिया वक्फ बोर्डाने म्हटले आहे. अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती 11 ऑगस्टपासून याचिकांवर सुनावणी करणार आहे.

 

COMMENTS