बोगस तावडेंना पदावरुन हटवा – संजय निरुपम

बोगस तावडेंना पदावरुन हटवा – संजय निरुपम

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल रखडल्याच्या विरोधात आज  (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने विद्यापीठाबाहेर आंदोलन केले. यावेळी कुलगुरु डॉ. संजय देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर या तिघांनाही तात्काळ पदावरुन हटवावे, अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या घोळामुळे पदवी परीक्षांचे निकाल रखडले आहेत. निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपालांनी वाढवून दिलेली 5 ऑगस्टपर्यंतची मुदतही होऊन गेली आहे. वाणिज्य आणि विधि परीक्षांचे निकाल जाहीर होण्यासाठी 15 ऑगस्ट उजाडेल, असे  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी  सांगितले.

संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आक्रमक  कार्यकर्त्यांनी विनोद तावडे आणि कुलगुरुंविरोधात घोषणाबाजी केली. संजय निरुपम यांनी विनोद तावडेंचा उल्लेख ‘बोगस’ तावडे असा केला. कुलगुरु आणि शिक्षण मंत्र्यांनी षडयंत्र रचल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले. कुलगुरु देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि उच्च व तंत्र शिक्षण ​विभागाचे राज्यमंत्री रविंद्र वायकर या तिघांनीही तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीच त्यांनी यावेळी केली.

कुलगुरुंनी मोठा घोटाळा केला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधीत कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री फक्त खोटे बोलत आहेत. ते निकालातील विलंबासाठी जबाबदारी असलेल्यांवर कारवाई करत नाहीत, याकडेही निरुपम यांनी लक्ष वेधले. कुलगुरु देशमुख हे संघाशी संबंधीत असल्याने मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे, असा दावा त्यांनी केला.

 

 

COMMENTS