नवी दिल्ली – भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदी म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी आज घेतली. भारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथबद्ध झाले. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिश्रा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित होते. विधि मंत्रालयाच्या वतीने यापूर्वीच न्या. मिश्रा यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. न्या. जे.एस. खेहर यांची जागा आता मिश्रा यांनी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असलेले 63 वर्षीय मिश्रा यांचा कार्यकाल 14 महिन्यांचा असेल. ते ऑक्टोबर 2018 मध्ये निवृत्त होणार आहेत. मिश्रा यांनी 14 फेब्रुवारी 1977 रोजी वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. ओडिशा उच्च न्यायालयात त्यांनी घटनात्मक, दिवाणी, फौजदारी, महसूल, सेवा आणि विक्रीकर खटल्यांमध्ये त्यांनी वकिली केली.
COMMENTS