मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु अचानक रजेवर !

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु अचानक रजेवर !

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख अचानक रजेवर गेले आहेत त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे हे त्यांचा पदभार सांभाळणार आहेत. तर मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी प्रा. धीरेन पटेल यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी धीरेन पटेल यांची नियुक्ती केली आहे. धीरेन पटेल यांच्याकडे सध्या व्हीजेटीआयच्या संचालकपदाची जबाबदारी आहे. तीन महिन्यांसाठी धीरेन पटेल यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी असणार आहे.

90 दिवसांनंतरही विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. राज भवनात झालेल्या बैठकीनंतर या पदासाठी पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर होईपर्यंत पटेल यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात मुंबई विद्यापीठाकडून हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र यातील अनेक परीक्षांचे निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाहीत. हे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची जबाबदारी पटेल यांच्या खांद्यावर असणार आहे.

कुलगुरू देशमुखांनी राज्यपालांकडे रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसारच ते रजेवर गेल्याचं बोललं जातंय. मात्र त्यांना राजभवनाकडूनच सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा आहे.

 

COMMENTS