मुख्यमंत्री गेल्यानंतर गोमुत्र आणि दुधाने केला रस्ता स्वच्छ !

मुख्यमंत्री गेल्यानंतर गोमुत्र आणि दुधाने केला रस्ता स्वच्छ !

नाशिक – औरंगाबाद महामार्गावरील नैताळे येथे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीत केलेल्या फसवणुकीविरुद्ध अनोख्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री लासलगाव दौऱ्यासाठी नाशिकहून रवाना होताना हे आंदोलन केले गेले.  मुख्यमंत्री महामार्गावरून गेल्यानंतर तो मार्ग गोमुत्र व दूधाने धुवून काढण्यात आला.

लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ आणि भारतीय रेल्वे यांच्या पुढाकाराने लासलगाव येथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शीतगृहाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी नेते रविवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या वतीने शेतकरी हितासाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यास सुरुवात करताच शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी ‘सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळामुळे विचलित न होता मुख्यमंत्र्यांनी, ‘प्रत्येक ठिकाणी काही जण असा गोंधळ घालत असल्याने मला त्याची सवय झाली असून उपस्थितांनी त्यांच्याकडे लक्ष न देता शांत बसावे’,  असे आवाहन केले. तरीही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरूच राहिल्याने मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना जोरात टाळ्या वाजविण्यास सांगितले. त्यानुसार उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट करून मुख्यमंत्र्यांना साद दिली.

लासलगावच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा नाशिक येथे जाण्यासाठी निघाला. हा ताफा निघून गेल्यावर निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांनी रस्त्याची गोमूत्राने स्वच्छता करीत आणि गाव बंद ठेवत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. सरकारकडून कर्जमाफीची जी घोषणा केली गेली ती अत्यंत फसवी आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, तसेच स्वामिनाथन आयोगही लागू करण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.  या आंदोलनाची चर्चा गावाच्या वेशीपासून सोशल मीडियावरही रंगली होती.

 

COMMENTS