मोदींवर टीका करणं ‘या’ अभिनेत्याला पडलं महागात, कोर्टात तक्रार दाखल !

मोदींवर टीका करणं ‘या’ अभिनेत्याला पडलं महागात, कोर्टात तक्रार दाखल !

लखनऊ – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, त्यामुळे माझे राष्ट्रीय पुरस्कार त्यांनाच देण्यात यावेत’ अशा शब्दात मोदींवर सडकून टीका करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर आज (बुधवारी) प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ न्यायालयात एका वकिलाने खटला दाखल केला. शनिवारी (दि. ७) यावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, ‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल किंवा नाही, मात्र सोशल मीडियावर काही लोक त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना मोदी स्वत:ला फॉलो करतात. याचीच चिंता मला जाणवत आहे. कुठे चालला आहे आपला देश?,’ असे प्रकाश राज म्हणाले होते.

COMMENTS