राज ठाकरेंकडून नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी

राज ठाकरेंकडून नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी

मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक फेरबदलाच्या बैठकांचे नियोजित वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांना झटके देण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी  भायखळा आणि शिवडी या विभागांच्या विभागाध्यक्षपदावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या समर्थकांची उचलबांगडी करत नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. विशेष म्हणजे भायखळा विभागात तर नांदगावकरांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या संजय नाईक यांचीच वर्णी लावत राज यांनी नांदगावकर गटाला जोरदार झटका दिल्याचं बोलले जात आहे.

पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी संवाद बैठकांचे आयोजन मनसेने सुरू केले आहे. आतापर्यंत 15 विधानसभा क्षेत्रामध्ये या बैठका झाल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या बैठका चालणार आहेत. दरम्यान 16 जूनला मनसेतर्फे एक पत्र जारी करण्यात आले होते. पत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अंगीकृत संघटना असलेल्या कामगार सेना, वाहतूक सेना, लॉटरी सेना, जनाधिकार सेना, स्वयं रोजगार संघटना या संघटनांमधील पदाधिकाऱ्यांची पदं बरखास्त करण्यात येत आहेत. तसेच या पदांचा गैरवापर केल्यास पक्षातर्फे कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता.

COMMENTS