सांगली – लग्नाला केवळ तीन तास राहिले असतानाच नवरदेवाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय 27, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे या नवरदेवाचे नाव आहे.
मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील एका मुलीशी ठरविण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हळदी समारंभ पार पाडला. शनिवारी मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. सकाळी व-हाडासह सर्व नातेवाईक मंगल कार्यालयामध्ये दाखल झाले होते. रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. मित्र व नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. नऊच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरु होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच वधू आणि वराकडील नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.
COMMENTS