रेल्वे मंत्रालयाने लातूरकरांची लातूर -मुंबई एक्स्प्रेसची बिदर विस्तार रद्द करण्याची मागणी फेटाळल्याने हे प्रकरण चांगलाच चिघळला आहे. आज (दि. 9) या मुद्द्यावरून आंदोलकांनी लातूर रेल्वे स्थानकावर निझामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस रोखत रेल रोको आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून लातूर व उदगीरसह शेजारील कर्नाटक राज्यातील बिदरमध्ये लातूर – मुंबई एक्सप्रेसचा वाद चालू आहे. लातूरकरांनी आंदोलनाचा पवित्रा घेत रेल रोको करण्यासाठी गर्दी केली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वेमंत्रालयाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत पंढरपूर- निजामाबाद रेल्वे सुमारे 20 मिनीटे लातूर स्थानकात अडवून ठेवली. पंढरपूर-निजामाबाद रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर आमदार अमित देशमुख स्वत: इंजिनवर चढून मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाविरोधात घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. 15 मिनिट रेल्वे रोखल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना बाजूला सारले. तीन आमदारांनी या रोकोत सहभाग नोंदवला.
यावेऴी आंदोलनकर्त्या लातूरकरांना रेल्वेस्थानकाबाहेरच पोलिसांनी अडवून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जनरेट्यामुळे अवघ्या 200 कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी रेल्वे स्थानकात प्रवेश दिला गेला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी निझामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस रोखून आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 1500 रेल्वे पोलीसांसह 200 महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी तैनात केले गेले होते. रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ लातूर-मुंबई रेल्वेचा बिदर विस्तार रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रेल्वे बचाव कृती समितीसह आमदार अमित देशमुख यांनी दिला आहे.
COMMENTS