शंकरसिंह वाघेला यांनी राहुल गांधींना केलं ‘अनफॉलो’

शंकरसिंह वाघेला यांनी राहुल गांधींना केलं ‘अनफॉलो’

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना ट्विटरवर ‘अनफॉलो’ केले आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाघेलांचं हे पाऊल काँग्रेससाठी चिंताजनक आहे.
वाघेला यांनी राहुल गांधी, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल तसेच काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांची ट्विटर अकाउंट ‘अनफॉलो’ केली. काँग्रेसच्या आयटी सेलची परिषद होत असतानाच वाघेला यांनी पक्षनेतृत्वाला धक्का दिल्याने येत्या काळात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वाघेला यांनी पत्रकारांशी बोलताना विधानसभा निवडणुका लढण्यासाठी आपण इच्छूक नसल्याचेही सांगितले. आयुष्यात मी अनेक निवडणुका लढलोय. त्यामुळे यापुढे लोकसभा, विधानसभा निवडणुका लढायच्या नाहीत, असे मी ठरवलेय. गुजरातमधील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी लढायचं, हे यापुढचे माझे ध्येय असल्याचे वाघेला म्हणाले.

गेल्या महिन्यात काँग्रेसच्या 57 पैकी 36 आमदारांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर वाघेला यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांचं नाव जाहीर करावं, अशी मागणी केली होती. मात्र पक्षाचे गुजरात प्रभारी अशोक गेहलोत यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यातच आता वाघेला यांनी राहुल गांधींनाच ट्विटरवर ‘अनफॉलो’ केल्याने राजकीय उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS