मुंबई विद्यापीठाच्या कारभारातील गोंधळाबाबत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी आदित्य यांनी याप्रश्नी कुलगुरु व शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी राज्यपालांकडे केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले.
आदित्य ठाकरे यांनी ऑनस्क्रिन असेस्मेँटचा गोंधळ निकाली लावण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. अजूनही पेपर तपासणीत गोंधळ सुरू असल्याची तक्रार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली. टेंडर प्रक्रीयेतील गोंधळ, कुलसचिव एम. ए. खान यांची झालेली बदली याबाबत राज्यपालांशी चर्चा करण्यात आली.
‘ऑनलाइन प्रवेश होत नसताना ऑनलाइनचा आग्रह का केला. यासाठी चार दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. ऑनलाइन असेसमेंटच्या निविदा कुणाला व कोणत्या आधारावर दिल्या. यामध्ये संशय येतो. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी’, अशी मागणी आदित्य यांनी केली आहे.
ऑनलाईन असेसमेंट प्रक्रियेच्या अपयशाला जबाबदार म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
COMMENTS