सदाभाऊ आता मदत मिळवून देण्यासाठीही अशीच तत्परता दाखवा !

सदाभाऊ आता मदत मिळवून देण्यासाठीही अशीच तत्परता दाखवा !

सोलापूर – अवकाळी पावसानं मंगळवारी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वा-यासह गारंचा पाऊस पडला. त्यामुळं रब्बीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. रब्बी पिकाबरोरबरच द्राक्षे आणि आंब्याचंही मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटानं हिरावून नेला. आधीच पिचलेल्या शेतक-याचं अवकाळी दणक्यानं कंबरडं मोडलं. अशा संकाटाच्या वेळी शेतक-याला अपेक्षा असते ती त्याला धीर देण्याची…. आर्थिक नुकसानभरपाई मिळेल तेंव्हा मिळेल मात्र मायबाप सरकारनं आपल्या पिकाची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी यावं, आपली दखल घ्यावी आणि पाठीवरुन हात फिरवून किमान लढ म्हणावं एवढी तरी अपेक्षा असते…. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ही तत्परता दाखवली… मंगळवारी रात्री अवकाळी दणका बसला अन् बुधवारी सकाळी 7 वाजता सदाभाऊ खोत पंढरपूर जिल्ह्यात शेतक-याच्या बांधावर दाखल होते. खरंचं सदाभाऊंचं यासाठी कौतुक करायला पाहिजे… फडणवीस सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्यानं अशी तत्परता दाखवली नाही. किमान तशा बातम्या तरी कुठे आल्या नाहीत. त्यामुळंच सदाभाऊ कौतुकाला पात्र आहात. मात्र आता तुम्ही सत्तेवरही आहात. त्यामुळे शेतक-याच्या बांधावर जाऊन तुम्ही पाहणी केली त्याला धीर दिला त्याच्या पाठीवरुन हात फिरवला, तसं आता त्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा… तर आणि तरच मग या भेटीचं पूर्ण सार्थक झाल्याचं समाधान तुम्हाला आणि शेतक-याला होईल… नाहीतर सदाभाऊंनी कोरडा धीर दिला असंचं शेतकरी म्हणतील…..

COMMENTS