सरसकट कर्जमाफी करायला हवी होती – धनंजय मुंडे

सरसकट कर्जमाफी करायला हवी होती – धनंजय मुंडे

परळी – राज्यातील शेतकर्‍यांकडील दीड लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेऊन तत्वतः सकारात्मक पाऊल उचलले आहे त्याबद्दल समाधान असले तरी सरसकट कर्जमाफी करायला हवी होती अशी प्रतिक्रीया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

कर्जमाफीच्या या निर्णयाचे संपुर्ण श्रेय शेतकर्‍यांचे आहे. त्यांनी आणि विरोधी पक्ष म्हणुन आम्ही मागील तीन वर्षांपासून करीत असलेल्या संघर्षामुळेच सरकारला झुकावे लागले असल्याचे ते म्हणाले. कर्जमाफी करताना मन मोठे करून सरसकट कर्जमाफी करायला हवी होती, लहान-मोठा शेतकरी असा भेदभाव न करता शेतकर्‍यांनी शेती संबंधीत घेतलेले शेती पुरक कर्जही माफ करायला हवे होते असे ते म्हणाले.

कर्जमाफीच्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी करताना विरोधी पक्ष म्हणुन या अंमलबजावणीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल शरद पवार यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आलेल्या काही सुचनांची दखल घेतल्याचे सांगुन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्याच्या दृष्टीनेही आता पाऊले उचलावीत, आज अखेर पर्यंत ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांना या निर्णयाचा लाभ मिळावा अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

COMMENTS