सावकारी पाशातील साडेसतरा लाख शेतकऱ्यांना कोलदांडा

सावकारी पाशातील साडेसतरा लाख शेतकऱ्यांना कोलदांडा

कर्जमाफीत २,१०० कोटींच्या सावकारी कर्जाचा समावेश नाही

मुंबई – आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सावकारी पाशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये विदर्भ, मराठवाड्यातील तब्बल साडेसतरा लाख शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून दोन हजार एकशे कोटींचे कर्ज घेतले आहे. राज्य सरकारने राज्यातील ९० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली असताना सावकारांच्या दावणीला बांधले गेलेल्या या शेतकऱ्यांचा कोणताच विचार केलेला नाही.

विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे ४० टक्के शेतकरी संस्थात्मक पतपुरवठ्यापासून वंचित राहतात. त्यांना पीक कर्ज आणि इतर बाबींसाठी सावकारांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये ४० टक्के बळी सावकारी कर्जामुळे जातात, हे खुद्द राज्य सरकारने सुद्धा कबूल केले आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेत आल्यानंतर डिसेंबर २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारने विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सावकारी कर्जमाफी जाहीर केली. राज्य सरकारने २०१५ मध्ये सावकारी कर्जासाठी १७१ कोटीचे पॅकेज दिले होते. यात मुद्दल आणि व्याजाचा समावेश होता. मात्र कठोर निकषांमुळे यापैकी खाजगी सावकारांची केवळ साठ कोटींची कर्जे माफ होऊ शकली. २०१५-१६ मधील या पॅकेजचा उर्वरीत सुमारे ११० कोटींचा निधी परत गेला. राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. यात २०१२ ते २०१६ या कालावधीतील सरसकट दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. ३० जून २०१६ पूर्वीच्या बँक थकबाकीदार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. दीड लाखांवरील थकबाकीदार, नियमित परतफेड कर्जदार आणि कर्ज पुर्नगठण केलेल्या शेतकऱ्यांना यात काही ना काही लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. राज्यात १२ हजार २०८ परवानाधारक खाजगी सावकार आहेत. या सावकारांनी सन २०१५ आणि २०१६ मध्ये अनुक्रमे ७ लाख ४ हजार शेतकऱ्यांना ८९६ कोटी आणि १० लाख ५६ हजार शेतकऱ्यांना १ हजार २५४ कोटींचे कर्जवाटप केले आहे. हे सर्व शेतकरी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे ३० जून २०१६ पूर्वी सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी करीत आहेत.

परवानाधारक खाजगी सावकार – १२,२०८
सन २०१५ मधील कर्जवाटप – ८९६ कोटी (शेतकरी संख्या – ७ लाख ४ हजार)
सन २०१६ मधील कर्जवाटप – १,२५४ कोटी (शेतकरी संख्या – १० लाख ५६ हजार)

COMMENTS