हवेवर आलेले आणि हवेत असलेले सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाही- अशोक चव्हाण

हवेवर आलेले आणि हवेत असलेले सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाही- अशोक चव्हाण

अजूनही वेळ गेली नाही, शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, न्याय द्या.

 

मुंबई – राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या 7 दिवसात 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे  सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत यावरून शेतक-यांचा या सरकारवर विश्वास नाही हे स्पष्ट झाले आहे. सरकार शेतक-यांना कर्जमाफी मिळावी म्हणून प्रयत्न करते आहे की, कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती घालत आहे ? या सरकारचा कारभार पाहता हे सरकार शेतक-यांच्या जीवावर उठले आहे, असे दिसते असे चव्हाण म्हणाले.

 

विरोधी पक्ष, सुकाणू समितींवर मुख्यमंत्र्यांकडून ज्या भाषेत टीका होते त्यातून सत्तेचा अहंकार दिसून येतो. त्यातही तीन महीने झाले तरी मुख्यमंत्र्यांना संघर्ष यात्रेवर टीका करावी लागते यातच सर्व काही आले. गेली अडीच वर्ष कर्जमाफी देणार नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना संघर्षयात्रेमुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांच्या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संप करावा लागला. संघर्ष यात्रेचे यश संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. भाजपच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते ? आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला ते मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे असे चव्हाण म्हणाले.

 

काँग्रेस पक्षाने कर्जमाफीचे खोटे आकडे आणि सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा जनतेसमोर उघडा पाडल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा त्रागा सुरु आहे. अजूनही वेळ गेली नाही.  शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, शेतक-यांना न्याय द्या. अन्यथा शेतकरी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

COMMENTS