ठाणे – शिवसेना नगरसेवकांनी आज महापालिका आयुक्तांच्या कार्यलयावर जोर हल्लाबोल केला. संतप्त सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात घुसत आयुक्तांची खुर्ची फेकून दिली. आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात आणि सेनेच्या नगरसेवकांच्या फायली दाबून ठेवत असल्याचा आरोप करीत आयुक्तांनी परत जाण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी केली.
निवडून येऊन 2 वर्ष उलटली मात्र तरीही साधे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आम्ही सोडवू शकलो नाही. कचऱ्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न तसाच असून महापालिका आयुक्त आणि अधिकारी सतत उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे महिला नगरसेवकांनी सांगितले. या प्रश्नी लोकांच्या प्रश्नांना आम्हाला तोंड द्यावे लागत असून महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात ठोस भूमिका घेणे अपेक्षित आहेत. मात्र त्यांच्याकडूनच अधिकाऱ्यांची बोटचेपी सुरू असून त्यामुळेच अधिकारी वर्ग माजल्याचेही महिला लोकप्रतिनिधींनी सांगितले. तर महापालिका आयुक्तांकडून भाजप नगरसेवकांची कामे बरोबर केली जातात आणि आमच्या फायली बाजूला ठेवल्या जात असल्याचा दुजाभाव करीत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. तर शासनानेदेखील 27 गावांचा समावेश करण्याबरोबर त्यांच्या विकासकामांसाठी निधी देणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची सत्ता असताना नागरी प्रश्न आणि विकासकामांसाठी सतत सत्ताधारी शिवसेनेलाच आंदोलन करावे लागत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
COMMENTS