पाचशे आणि दोन हजार रुपयाच्या नोटांच्या वेगवेगळ्या आकारावरून विरोधकांनी आज (मंगळवारी) केंद्र सरकारला धारेवर धरले. पाचशे आणि दोन हजारच्या नोटा संसदेत दाखवल्या. या नोटांचे डिझाईन आणि आकार वेगवेगळ्या असल्याचे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिले. या शतकातील सरकारचा हा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणी काँग्रेसने तृणमूल आणि जदयूच्या मदतीने राज्यसभा दणाणून सोडली.
काँग्रेस नेत्यांनी सभागृह नेत्यांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. भाजपसोबत बिहारमध्ये जदयूने युती केल्याने जदयूचे नेते शरद यादव हे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज काँग्रेसला साथ देत पाचशे रुपयांच्या मोठ्या आकारातील झेरॉक्स प्रती दाखवत गोंधळ घातला. “मी नोटांच्या प्रतींवर सह्या करून द्यायला तयार आहे”, असे त्यांनी कोषागार अधिकाऱ्यांना सांगितले. “जगातील कुठल्याही देशाकडे एकाच मुल्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या नोटा नाहीत”, असेही यादव यावेळी म्हणाले. दरम्यान, विरोधक विनाकारण शुल्लक गोष्टींचा बाऊ करीत आहेत, असे यावेळी अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले.
COMMENTS