पुणे – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे जर कोणी ट्विट करुन मदत मागीतली तर त्या तत्परतेनं धावून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे एक ट्विट सुषमा स्वराज यांना पुणेकर तरुणाने केलं आहे. विशाल सूर्यवंशी या तरुणानं सिनेमा पाहताना थिएटरमधूनच थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं आणि लवकरात लवकर मला वाचवा, अशी साद घातली.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाचा अनेकांनी पाणउतारा केला आहे. त्यातून सिनेमा किती ‘डेंजर’ आहे, हे त्यानं अत्यंत मार्मिक शैलीत सांगितलं. त्याचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं. हा संपूर्ण सिनेमा युरोपमध्ये घडतो. म्हणूनच तिथून सोडवण्यासाठी विशालनं स्वराज यांना विनंती केली.
जर अस्सल पुणेकर व्हायचं असेल, तर समोरच्याचा किमान शब्दांत कमाल अपमान करता यायला हवा, असं विनोदाने म्हटलं जातं. पुणेरी पाट्यांमधून अनेक पुणेकरांनी त्यांची ही ‘खासियत’ दाखवूनही दिली आहे. याच ‘गुणा’ची झलक दाखवत एका पुणेकर तरुणाने ट्विटरवर धम्माल उडवून दिली.
COMMENTS