पाटणा – बिहारमधील राजकीय संघर्षाला मंगळवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या ताफ्यावर वैशाली जिल्ह्यात हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सुशीलकुमार मोदी यांना कोणतिही इजा झालेली नसून, ‘हा भ्याड हल्ला आहे. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.
सुशीलकुमार मोदी मंगळवारी सायंकाळी पक्ष कार्यकर्त्यांच्या एका बैठकीला जात होते. त्यावेळी काही अज्ञातांनी विटा आणि दगडफेक करत मोदी यांच्या गाडीला लक्ष्य केले. यात गाडीच्या काचा फुटल्या. पण, सुशीलकुमार यांना कोणतिही दुखापत झाली नाही. सुरक्षा रक्षकांनी कडे करून त्यांचा बचाव केला.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांचा ताफा काही वेळापूर्वीच त्या ठिकाणाहून गेला होता. त्यानंतर हा हल्ला झाला. ज्या परिसरात सुशीलकुमार यांच्यावर हल्ला झाला. तो संपूर्ण परिसर राष्ट्रीय जनता दलाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
COMMENTS