दीड लाखांवरील कर्ज भरा तरच कर्जमाफीचा लाभ – मुख्यमंत्री

दीड लाखांवरील कर्ज भरा तरच कर्जमाफीचा लाभ – मुख्यमंत्री

जोपर्यंत शेतकरी दीड लाखाच्या वरचं कर्ज भरणार नाहीत तोपर्यंत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्जमाफी केली तर बँका त्यांच्या व्याजाची रक्कम वळती करून घेतील, म्हणून हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय.

सरकार देत असणारी दीड लाखांची रक्कम बॅंकेकडे भरली जाणे हे शेतकऱ्यांच्याच हिताचे आहे. कारण बॅंकांच्या नियमानुसार आधी कर्जावरचे व्याज भरून घेतले जाते. 2008 मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्यातही असाच नियम होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीची जी आकडेवारी जाहीर झाली आहे ती योग्यच आहे. काही लोक आता नव्याने गणिततज्ज्ञ झाले आहेत. 90 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड लाख द्यायचे तर फक्त साडे तेरा हजार कोटी रुपये लागतात असे ते म्हणत आहेत ते चूक आहे. सर्वांना दीड लाख रुपये भरायचे तर एक लाख 35 हजार कोटी रुपये लागतील, असे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीमुळे राज्यातील विकासकामांवरही निश्चितच परिणाम होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

 

COMMENTS