एकनाथ खडसेंनी काय सांगितलं अजितदादांच्या कानात ?  त्यावर अजितदादा काय म्हणाले ?

एकनाथ खडसेंनी काय सांगितलं अजितदादांच्या कानात ?  त्यावर अजितदादा काय म्हणाले ?

जळगाव –  नाराज भाजप नेते एकनाथ खडसे हे काल जळगामध्ये अजित पवार यांच्यासोबत एका स्टेजवर येणार असल्यामुळे माध्यमांध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. काही टीव्ही चॅनलनी तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचीही शक्यता वर्तविली होती. त्यामुळेच डॉ. सतिश पाटील यांच्या सर्वपक्षीय सत्कार कार्यक्रमाकडे  काल राज्याचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश झाला नाही. मात्र खडसे आणि अजित पवार यांनी खडसेंच्या नाराजीवर भाषणात चांगलीच रंगत आणली.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी त्यांच्या भाषणात टीव्हीवरील बातम्यांचा हवाला देत, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला सुरूवात केली. सगळीकडे चर्चा तर सुरू आहे. मात्र नाथाभाऊंच्या मनात काय आहे हे कोणास ठाऊक असा सवाल केला. त्यावर एकनाथ खडसे यांनीही त्याला उत्तर दिले. तुमच्या मनात जे आहे. ते माझ्या मनात नाही असं त्यांनी ईश्वरलाल जैन यांना उद्देशून सांगितलं. मात्र माझ्या  मनात काय आहे ते मी अजित दादांना कानात सांगितलं आहे असं वक्तव्य केलं. त्यामुळे खडसेंनी अजितदादांच्या कानात नेमकं काय सांगितलं याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

अजित पवार हे त्यांच्या भाषणात त्यांच्या कानात खडसेंनी नेमकं काय सांगितलं यावर बोलतील अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे ते बोललेही. मात्र खडसेंनी आपल्याला जे कानात सांगितलं ते आपण तुम्हाला सांगणार नाही असं सांगत संशय कायम ठेवला. या आपल्या वक्तव्यामुळे भाजपच्या नेत्यांना झोप येणार नाही असंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे खडसेंनी अजितदादांच्या कानात नेमकं काय सांगितलं याचं उत्तर शेवटपर्य़ंत मिळू शकलं नाही.

या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची तोंडभरुन स्तुती केली. अजितदादांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याची आठवण सांगितली. तर मोपलवारांची तातडीने चौकशी होते आणि त्यांना क्लिन चिट देऊन त्याच पदावर बसविले जाते. मग खडसेंना वेगळा न्याय का असा सवाल त्यांनी केला. खडसेंच्या चौकशीचं गु-हाळ लांबवत ठेवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. चार दिवस सासुचे तर चार दिवस सुनेचे येत असतात असं सांगत दिवस कधी फिरतील याचा नेम नाही या शब्दात त्यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला.

COMMENTS