अमित राज ठाकरेंचा आज साखरपुडा, उद्धव ठाकरे कुटुंबिय कार्यक्रमाला उपस्थित राहणार का ?

अमित राज ठाकरेंचा आज साखरपुडा, उद्धव ठाकरे कुटुंबिय कार्यक्रमाला उपस्थित राहणार का ?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे लवकरच लंग्नबंधनात अडकणार आहेत.  आज त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं असून अमित ठाकरेंचा साखरपुडा प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मितालीसोबत महालक्ष्मी रेसकोर्सवर असलेल्या टोड्स हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

अमित आणि मिताली गेली पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमबंधात होते. महाविद्यालयीन शिक्षणावेळी त्यांचे एकमेकांशी सूर जुळले असल्याची माहिती आहे. अमितनं पोद्दार महाविद्यालयातून वाणिज्य पदवी प्राप्त केली असून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षण घेतले आहे. तसेच ते व्यंगचित्रकार देखील असून राजकारणात देखील सक्रीय आहेत.तसेच मिताली फॅशन डिजायनिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अमित नुकतेच एका दुर्धर आजाराशी लढून सुखरूप बाहेर पडलेत. त्यावेळी आजारात अमितला मितालीनं मोलाची साथ दिली.

अमित यांचा साखरपुडा अत्यंत खाजगी असून या साखरपुड्याला कुटुंबातील मोजके सदस्यच सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान अमित लवकरच मनसेच्या सक्रिय राजकारणात पूर्णपणे दिसण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्याकडे लवकरच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची सूत्र सोपवली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS