नाशिक – आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तर पक्ष सोडण्याचा इशारा भाजप नेत्यानं दिला आहे. नाशिकमध्ये शिवसेना-भाजप युतीचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यानंतर भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाचा विचार करावा, अन्यथा कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवावी लागेल, असा सूचक इशारा दिला आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
दरम्यान माणिकराव कोकाटे गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारसंघात त्यांनी चांगला संपर्कही वाढवला आहे. परंतु ऐन वेळेला तिकीट मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बंडखोरीची भाषा सुरू केली. युतीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची वाट बघतो आहे असं सूचक विधान करून कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडे सिन्नर आणि इतर भागात जनसंपर्क चांगला आहे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने कोकाटे यांना पाठिंबा देणारा समाज देखील मोठा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोकाटे यांनी निवडणूक लढवली तर त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS