शिवजयंती तिथीवरुन की तारखेवरुन, विधानसभेत गदारोळ !

शिवजयंती तिथीवरुन की तारखेवरुन, विधानसभेत गदारोळ !

नागपूर – नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात अनेक विषयांवर विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं पहावयास मिळत आहे. शुक्रवारी अधिवेशनादरम्यान विधानसभेत शिवजयंतीवरुन गदारोळ झाल्याचं पहावयास मिळालं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी भाजपचे आमदार सुरेश हळदणकर यांनी केली आहे. हळदणकर यांच्या मागणीवर विरोधकांनी आक्षेप घेऊन सभागृहात एकच गोंधळ घातल्याचं पहावयास मिळालं आहे.

सरकारने तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात काही बदल केला नसताना हा मुद्दा का उपस्थित करण्यात आला असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे. तसेच हळदणकर यांचे म्हणणे कामकाजातून काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्याचदरम्यान शिवसेनेनंही या  वादात उडी घेतली असून भाजप आमदार हळदणकर यांच्या म्हणण्यानुसार शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी  करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.

हळदणकर आणि शिवसेनेच्या मागणीनंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिवसेना – भाजपा युतीचे सरकार असताना याबाबत वाद उद्भवला होता, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक तज्ज्ञांची समिती नेमली होती, त्या समितीने तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याची शिफारस केली होती, त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे, आता  यावर वाद का निर्माण केला जातोय असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी केलं आहे.

COMMENTS