भाजप आमदारानंच केला भ्रष्टाचाराचा पर्दाफाश!

भाजप आमदारानंच केला भ्रष्टाचाराचा पर्दाफाश!

नागपूर – हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारला विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून घेरलं जात असताना आता काही भाजप आमदारही सरकारविरोधात उतरले असल्याचं दिसत आहे. विधानसभेत शुक्रवारी भाजपचे आमदार राजेंद्र पटणी यांनी समाजकल्याण विभागातील भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला असल्याचं दिसून आलं आहे. समाजकल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पटणी यांनी केला आहे. तसेच या भ्रष्टाचाराची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मागासवर्गीयांच्या घरकुल योजनेतील घरावर लावण्यासाठी घेतलेल्या पाट्यांमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचं राजेंद्र पटणी यांनी म्हटलं आहे. घरकूल बांधले नसताना दीड लाख पाट्या विकत घेतल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच एका पाटीसाठी १५०० रुपये किंमत सरकारनं मोजली असल्याचं ते म्हणालेत. तसेच पाटी लावण्यासाठी दोन स्क्रू ९० रुपयांना विकत घेतले असल्याचंही पाटणी यांनी म्हटलं आहे. ८० हजार पाट्या खरेदी करण्याची ऑर्डर मंत्रालयातून निघाली असल्याचा दावाही पाटणी यांनी केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच समाजकल्याण आयुक्तांनी १२ कोटींच्या पाट्या खरेदी केल्या असून त्या तशाच पडून असल्याचा आरोपही पाटणी यांनी केला आहे.

पुरवठादार मंत्र्यांना साहित्य खरेदीचे पत्र देतो, मंत्री पूट अप असा शेरा लिहितात आणि अधिकारी त्या आधारे गरज नसताना वस्तू विकत घेतात असा आरोपही त्यांनी भाजपच्याच मंत्र्यांवर केला आहे. अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी केली, एक्स्पायरी डेट निघून गेली तरी ही औषधे पडून असल्याचा आरोपही राजेंद्र पाटणी यांनी केला आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लहान चपला घेण्याऐवजी १० आणि ११ नंबरच्या चपला घेतल्या आणि त्याचे वाटप झाले नसल्याचा खुलासाही पाटणी यांनी केला. तसेच वसतिगृह बांधले नसताना त्या ठिकाणी बसवण्यासाठी  २० हजार रुपयांचा एक टीव्ही ९० हजार रुपयांना विकत घेतला असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच हे टीव्ही अधिकार्‍यांच्या घरी गेले असल्याचंही पाटणी यांनी म्हटलं.या सर्व घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी राजेंद्र पाटणी यांनी केली आहे. यावरुन एका भाजप आमदारानंच समाजकल्याण विभागाचे वाभाडे काढले आहेत.

COMMENTS